‘सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा’… नवी मुंबईतील दर्याच्या राजाची उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी | पुढारी

'सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा'... नवी मुंबईतील दर्याच्या राजाची उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा कोळी समाज बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. मासेमारीच्या व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या आगरी कोळी बांधवांचे आणि समुद्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या अनुषंगाने ‘सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा’ अशी गाणी गात, बँजो, ढोल-ताशाच्या गजरात तालावर थिरकत नवी मुंबईत हजारो कोळी समाज बांधवांनी समुद्राची मनोभावे पूजा केली. दर्याला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यंदा दोन वर्षानंतर आगरी कोळी समाज बांधवांनी नारळी पौर्णिमा धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. नवी मुंबईला लाभलेल्या 29 किलोमीटरच्या सागरी खाडी किनारी वास्तव्यास असलेले दिवाळे गाव, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी गाव, जुईनगर बनकोडे, कोपरखैरणे, घणसोली, सानपाडा, तळवली, दिवागाव, ऐरोली, नेरूळ, आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी पारंपरिक वेश ( टी-शर्ट डोक्यावर टोपी) धारण करून पालखी मिरवणूक वाजत गाजत काढली.

समुद्राकाठी जाऊन नारळ अर्पण करण्यात आला. आगरी कोळी समाज बांधव आठवड्यापासून या सणाच्या तयारीत होते. पौर्णिमेपासून कुटुंबाचा चरितार्थाचे माध्यम असलेल्या होड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि हा उत्सव द्विगुणीत करण्यासाठी दिवाळे, सारसोळे, वाशी गाव, सानपाडा, जुईनगर, घणसोली आणि नेरूळ कोळीवाड्यांमध्ये गाण्यांची जोरदार तयारी केली होती.

सानपाड्यात जंगी महोत्सव 

सानपाडा ग्रामस्थ तसेच रहिवासी नारळी पौर्णिमेनिमित्त एकत्र आले. आज सकाळी ११ वाजता सानपाडा गावदेवी मंदिरात सोनेरी कागदी मुलामा लावलेला श्रीफळ घेऊन ग्रामस्थ नाचत वाजत गाजत बुद्धेश्वर मंदिरात आले. त्यानंतर भाविक पालखी पुढे नाचत गेले. वाशी खाडी किनारी असलेल्या हौशीराम नाखवा डोलीवर सर्व विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सगळा हंगाम व्यवस्थित पार पडू दे, अशी समुद्राला प्रार्थना करून सुवर्ण मुलाम्याचा नारळ अर्पण केला. ही माहिती सानपाडा नारळी पौर्णिमा समितीचे अध्यक्ष मुकेश ठाकूर यांनी दिली. या धार्मिक सोहळ्यात नामदेव ठाकूर, विठ्ठल मोरे सोमनाथ वास्कर तसेच सानपाडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button