शिंदेंना काही मुद्यांवरुन पाठिंबा दिला होता, पण आता विचार करु, बच्चू कडू यांचा सूचक इशारा | पुढारी

शिंदेंना काही मुद्यांवरुन पाठिंबा दिला होता, पण आता विचार करु, बच्चू कडू यांचा सूचक इशारा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सुमारे ३९ दिवसांनंतर शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. सरकारच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात १८ जणांनी शपथ घेतली. शपथ घेणारे सर्वजण कॅबिनेट मंत्री असून एकही राज्यमंत्री नाही. यात भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ आमदार आहेत. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात अपक्षांना स्थान दिलेले नाही. यामुळे प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने नाराज आहे. पण ही नाराजी क्षणिक आहे. विस्तार अजून व्हायचा आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काही मुद्यांवरुन शिंदे यांना पाठिंबा दिला होता. पण आता विचार करु. त्यांनी मंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

मंत्रिपद आमचा हक्क : कडू

भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये अपक्ष, मित्रपक्षांनीही साथ दिली. मात्र पहिल्या विस्तारात अपक्षांना संधी देण्यात आली नाही. दिव्यांग कल्याण मंत्रालय, रोजगार हमी विभाग यासाठी आम्ही आग्रही आहोत. मंत्रिपदाचा आमचा हक्क, अधिकार आहे ते आम्ही मिळवू. सामान्य माणसांचे विषय मार्गी लागावेत याला प्राधान्य आहे. मित्र पक्ष, अपक्षांशिवाय सरकार राहू शकत नाही. राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते. आम्हाला शब्द दिला आहे. आता काही पावले मागे घेतली असली, तरी त्यांनी शब्दाला ठाम राहावे, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी व्यक्त केली होती.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर आता खातेवाटपाची प्रतीक्षा असून भाजप आणि शिंदे गट यांच्यात कोणकोणती खाती विभागली जाणार याबद्दल उत्सुकता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःकडे नगरविकास खाते ठेवण्याची शक्यता असून गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. ऊर्जा, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम ही खाती भाजपकडे; तर उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, ही खाती शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

 हे ही वाचा :

Back to top button