राज्य मंत्रिमंडळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री | पुढारी

राज्य मंत्रिमंडळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सर्मसमावेशक, सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणीही नाराज होण्याची प्रश्न नाही. राज्यातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी आमचे मंत्रिमंडळ प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. ९) दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट व भाजपकडून प्रत्येकी ९ जणांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), चंद्रकांत पाटील (कोथरूड), सुधीर मुनंगटीवार (बल्लारपूर), विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), मंगलप्रभात लोढा (मुंबई) यांनी शपथ घेतली. तसेच शिंदे गटाचे संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, अब्दूल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई  यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथ घेतली. वारंवार तारखा सांगूनही मंत्रीमंडळ विस्तार झाला नव्हता. दोघांकडून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात होते. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी अनिश्चितता होती. या याचिकेवर निर्णय आल्यानंतरच विस्तार केला जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे विरोधी पक्ष शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका केली होती. अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button