

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबईसह नाशिकमध्ये शिवसेनेने आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी आज (दि.१) भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस केली. मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबियांना दिला. तसेच राऊत यांच्या मातोश्रीचीही विचारपूस केली.
यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार रविंद्र वायकर उपस्थित होते. ठाकरे यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा दिला. दरम्यान उद्धव ठाकरे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने रविवारी रात्री अटक केली. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली होती. त्या विरोधात पाटकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर वाकोला पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.