जुने व्हायरस परत आलेत, बंदोबस्त करावा लागेल : सीएम ठाकरे | पुढारी

जुने व्हायरस परत आलेत, बंदोबस्त करावा लागेल : सीएम ठाकरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलातची भाषा केल्याने या संघर्षाला अधिकच धार आली आहे. या प्रकरणात नारायण राणेंना अटक झाली व सशर्त जामिन मिळाला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यांनी राणेंच्या टिकेपासून स्वत:ला दूर ठेवले होते. मात्र, त्यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना राणेंना नाव न घेता अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात काही लोकांकडून राजकीय पर्यटन सुरु आहे. जुने व्हायरसही परत आले आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळे त्यांचा बोलण्याचा रोख नारायण राणे यांच्याकडेच होता हे स्पष्ट आहे.

कोरोनाचे संकट अजूनही गेलेलं नाही

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संकट पूर्णपणे टळलं नसल्याचे सांगितले. काही जुने व्हायरस परत आल्याचे दिसून येत आहे. ते व्हायरस कारण नसताना साईड इफेक्टस आणत आहेत. या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला उघड करायचं असून एक दिवस मास्कही काढायचा आहे.

राजकारण चालू राहील पण आज जनतेसमोर त्यांच्या रोजीरोटीची भ्रांत आहे. त्याचं पहिलं काय करणार ते सांगा. जर रोजीरोटी मिळाली नाही, तर अस्थितरता माजल्याशिवाय राहणार नाही. पुढील काळात उद्योजक आणि उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचलं का?

Back to top button