भिवंडी : उपजिल्हा रुग्णालयातील एच.आय.व्ही. विभागात उंदरांचा सुळसुळाट | पुढारी

भिवंडी : उपजिल्हा रुग्णालयातील एच.आय.व्ही. विभागात उंदरांचा सुळसुळाट

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालय येथे असणाऱ्या एच. आय. व्ही. विभागात उंदरांचा सुळसुळाट झाला असून येथे सामाजिक संस्थेने दिलेली प्रोटीन पावडरची पाकिटे उंदराने कुरतडली असून विभागातील जमीनच उंदराने अक्षरशः उकरून काढली आहे. त्यामुळे प्रोटीन पावडरचे बॉक्सच्या बॉक्स कर्मचाऱ्यांना फेकून द्यावे लागले आहेत.

भिवंडी महापालिका क्षेत्रातील इंदिरा गांधी हे एकमेव रुग्णालय आहे. सुरुवातीला हे रुग्णालय चालवण्याची जबाबदारी महापालिकेकडे होती. मात्र महापालिकेला खर्च झेपेनासा झाल्याने त्यांनी हे रुग्णालय शासनाकडे सुपूर्त केले. त्यानंतर या संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी शासनाने घेतली. या रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्य देखील मोठी आहे.

त्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यासाठी मान्यता मिळाल्याने रुग्णालयात त्यासंदर्भात काम सुरू झाले आहे. मात्र, रुग्णालयाच्या तळाशी असलेल्या एच. आय.व्ही सेंटरकडे रुग्णालयाचे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी या विभागात रुग्ण बसतात त्याठिकाणी लाईट आणि फॅन बंद असल्याची तक्रार देखील दिली असून अद्याप ते देखील दुरुस्त करण्यात आलेले नाही.

त्यामुळे सगळ्यात जास्त रुग्ण ज्या विभागात उपचार घेण्यासाठी येतात त्याच ठिकाणीं गैरसोयी अधिक आहेत. विशेष म्हणजे सामाजिक संस्था गरजू रुग्णांना बॉक्समधून प्रोटीन पावडरची पाकीट देतात. मात्र हे बॉक्स कुरतडून त्यातील प्रोटीन पावडरच्या पाकिटांना देखील उंदराने तोंड लावले आहे. जमीन उकरल्याने फरशी तुटली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचा पायाला देखील फरशीमुळे इजा होण्याची शक्यता आहे.

आम्ही यासंदर्भात दाखल घेतली असून योग्य ती कारवाई करू. तसेच यासंदर्भात योग्य तो पत्र व्यवहार केला जाईल.
– डॉ. अविनाश धनावडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी

Back to top button