हिंगोली : इसापूर धरणाचे ९ वर्षानंतर उघडले दरवाजे | पुढारी

हिंगोली : इसापूर धरणाचे ९ वर्षानंतर उघडले दरवाजे

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : इसापूर धरणामधील पाणीसाठा वाढल्यामुळे गुरुवारी (दि.२८) सायंकाळी धरणाचे दोन वक्र दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडून त्यातून 1295 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तब्बल 9 वर्षानी धरण भरल्यामुळे जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस असल्यामुळे धरणात पाण्याची आवक चांगली आहे. चालू वर्षात 1 जूनपासून आजपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 734 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणाच्या जलाशयातील पाणी पातळी 440 मीटर आहे. तर जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा 870.57 दशलक्ष घनमीटर एवढा आहे.

आज दुपारी तीन वाजता धरणामध्ये 440.09 मीटर पाणीसाठा झाला असून धरणात 1193.70 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी 91.15 टक्के एवढी आहे. तर ता. 31 जुलैपर्यंत धरणामध्ये 440.12 मीटर म्हणजेच 91.43 टक्के पाणीसाठा ठेवावा लागणार आहे.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरू असल्याने गुरूवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत धरणात 8.17 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ लक्षात घेऊन सायंकाळी पाच वाजता धरणाचा दरवाजा क्रमांक 2 व दरवाजा क्रमांक 14 हे दोन वक्र दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या दरवाज्यातून 1295 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगंडे यांनी सांगितले. जुलै महिन्यात दरवाजे उघडण्याची मागील नऊ वर्षातील पहिलीच वेळ आहे. या पुर्वी 24 जुलै 2013 मध्ये दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. त्यानंतर जुलै 2022 गुरूवारी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Back to top button