उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड तुरुंगात ५ जणांचा हल्ला | पुढारी

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीवर आर्थर रोड तुरुंगात ५ जणांचा हल्ला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीवर तुरुंगात हल्ला झाला आहे. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ७ आरोपींना ठेवण्यात आले आहे. त्यातील एक असलेल्या शाहरुख पठाण याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. तुरुंगातील पाच कैद्यांनी हा हल्ला केला असल्याचे समजते. तुरुंगात झालेल्या वादातून हाणामारी झाली. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने सर्व आरोपींना वेगवेगळे ठेवले आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिस याचा तपास करत आहेत.

भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे उदयपूरपाठोपाठ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातही एकाचा बळी घेण्यात आला होता. उदयपूर येथे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वक्‍तव्यावरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद उमटत असतानाच अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे (५४) यांची गेल्या २१ जून रोजी अमरावतीत भररस्त्यात अडवून गळा चिरून हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अमरावतीमधील १० जणांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी ७ जणांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे.

सर्व आरोपींना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएचे पथक १३ जुलै रोजी दोन आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते.

Back to top button