उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचं तुफान आहेच. लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले, "का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी तर शिवसेनेचा आहे. मी पक्षप्रमुख आहे. पण माझा हेतू तो नव्हता. मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करुन बसेन? शिवसेना मला वाढवायची आहे…आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पपक्षप्रमुख?.

"ज्यांना मी आपले मानले, तीच माणसं सोडून गेली. म्हणजेच ती माणसं कधीच आपली नव्हती. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांची लालसा! स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, 'ही आमची शिवसेना' म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री! अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे.

आमदार, खासदार सोडून गेल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की हे खासदार गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झाले असते हो? हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते आता अडीच वर्षांनी पडले असे मी समजतो. माझ्या मनात हेच आले की, हे सगळे…यातले अनेक जण…त्यांनी कितीही काणी म्हणो. माझ्या कुटुंबाचेच घटक होते. मी भेटत नव्हतो! माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो तेव्हा भेटू काय शकणार होतो. माझे हात-पाय हलत नव्हते. इतर वेळी 'हे' आमच्या कुटुंबातीलच एक होते. निधी वैगेरे दिला नाही म्हणाल तर त्या दिवशी तर अजित पवारांनी सांगितलेय की, ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी दिले. काही ठिकाणी शेवटच्या काळात असमानता आहे असं मला वाटलं तेव्हा काही निधीवाटपाला मी स्थगितीही दिली होती. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा सुरु होती की, निधीवाटपात अशी असमानता असेल तर हा प्रश्न आपण सोडवायला हवा…आणि अधिवेशन सुरु असताना अशोक चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता.

फुटीर आमदार कर्नाटकात का नाही गेले? मध्य प्रदेशात का नाही गेले? पहिले गोव्याला का नाही गेले? राजस्थानला का नाही गेले? पहिले गुजरातेतच का गेले? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. कारण नसताना शिवसैनिकांना ईडीपिडी लावली. छळ चाललाय, असा आरोप त्यांनी केला आहे.

ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे ते उपमुख्यमंत्री झाले यावर बोलताना ठाकरे यांनी, ही उपरवाले की मेहरबानी म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना महाराष्ट्रात घडवायचा आहे या प्रश्नावर ठाकरे यांनी, शिवसैनिकाकडून शिवसेना संपवायचीय, पण जे गेलेत ते शिवसैनिक नाहीत हे लक्षात घ्या असे नमूद केले आहे.

मला सातत्याने भासवलं जात होते की, काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेबांवर तक अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. तेच तुम्हाला पाडतील असे सगळे म्हणायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे. मात्र मला माझ्याच माणसांनी दगा दिला. मग सभागृहात एका जरी माणसाने माझ्याविरोधात मत दिलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

चाबी 'वरनं' जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार

अजून सरकार स्थापन का झाले नाही या प्रश्नावर बोलताान ठाकरे म्हणाले, नाहीच! कारण सध्या 'हम दो, एक कमरे मे बंद हो…और चाबी खो जाय' असेच सर्व काही सुरु आहे. चाबी 'वरनं' जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

मुंबईवर भगवा फडकत आहे आणि तो पुन्हा फडकणार असा दावा त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला प्रचंड गर्दी उसळत असल्याचे ते म्हणाले. मी ऑगस्टमध्ये बाहेर पडणार आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिल्यात, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्यांच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी. हे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news