आमदार, खासदार गेले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, संजय राऊतांचा दावा | पुढारी

आमदार, खासदार गेले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, संजय राऊतांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपर्यंत शिवसेनेचा कोणताही मुख्यमंत्री दिल्लीला सरकार स्थापनेची मान्यता घेण्यासाठी आला नाही. पण शिंदे मंत्री मंडळाची यादी घेऊन दिल्लीला आले आहेत, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच  कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना संघर्ष करायला तयार आहे. शिवसेना भवन व मातोश्री जर कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांचे मेंदू तपासावे लागतील, असेही राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्ली येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परभणीचे संजय जाधव हे शिवसेनेसोबतच असल्याचा दावा देखील केला आहे.

महाराष्ट्रातील ज्या खासदारांच्या व आमदारांच्या घराबाहेर पोलिसांचे चौकी पहारे लागले आहेत, त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणे कठीण करू. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे भाजपचे नेते खुलेआम सांगत आहेत. त्याआधी शिवसेनेचे तुकडे करणे, शिवसेना फोडून शिवसेनेची ताकद कमी करणे हा भाजपचा डाव आहे. पण शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार व खासदार पाठीत खंजीर खूपसून जात असले, तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना पुन्हा उभी राहील असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

केंद्रीय यंत्रणांचा व पैशाचा वापर होत आहे. पण जे होईल ते पाहून घेऊ, कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना संघर्ष करायला तयार आहे. शिवसेना भवन, मातोश्री हे जर कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांचे मेंदू तपासावे लागतील. शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण ती शिवसेना नाही. तो फूटीर गट आहे. त्याला कायदेशीर मान्यता नाही. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री असल्याने दिल्लीला त्यांच्या यंत्रणेकडे आले असतील. पण मंत्रीमंडळाची यादी घेऊन याआधी कोणतेच मुख्यमंत्री याआधी दिल्लीला आले नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button