राष्ट्रवादी देणार भाजपला धक्का; वैभव शिंदे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता | पुढारी

राष्ट्रवादी देणार भाजपला धक्का; वैभव शिंदे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता

इस्लामपूर : अशोक शिंदे

राष्ट्रवादी मध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे हे येत्या आठवड्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे गटा-तटाचे राजकारण तालुक्यात वाढले आहे. आधीच गटातटाने पोखरलेल्या तालुक्यातील भाजपला हा धक्का आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून माजी आ. स्व. विलासराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले. त्यावेळी व त्याआधीदेखील बराच काळ त्यांचे सुपुत्र वैभव शिंदे हे प्रदेश युवक काँगे्रसमध्ये राज्य सरचिटणीस तसेच 2002 पासून पंचायत समिती सदस्य ते वाळवा पंचायत समिती उपसभापतिपदावर आले. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री यादेखील पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आल्या.
गोटखिंडी, बावची, कारंदवाडी येथून त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते.

राज्यात भाजपची सत्ता आल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये उड्या घेतल्या. त्यामध्ये 29 मे 2018 ला इस्लामपूरमध्ये देखील नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि तत्कालिन राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तालुक्यातील भाजपमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विकास आघाडीचे पालिका नेते विक्रम पाटील तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेले युवा नेते राहुल व सम्राट महाडिक त्यांच्याच जोडीला जिल्हा बँकेेचे संचालक सी.बी. पाटील त्याचबरोबर वाळवा तालुक्यात भाजपमधूनच माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना व भाजपमध्ये प्रवेश केलेले सत्यजित देशमुख यांना मानणारे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. असे असताना रयत क्रांतीचे नेते आ. सदाभाऊ खोत यांचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपला साथ असते.

आता या भल्या मोठ्या गटांतर्गत संघर्षातून भाजपला रामराम ठोकून वैभव शिंदे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत्या आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विधानसभेलादेखील या आष्टा परिसरातून माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील व सहकार्‍यांनी ना. जयंत पाटील यांनी मोठे मताधिक्क्य दिले होते. या सार्‍या पार्श्वभूमीवर आता तालुक्यात भक्कम होत असलेल्या राष्ट्रवादीला बळकटी मिळताना भाजपला मात्र नगरपालिका निवडणुकांआधीच हादरे बसू लागले आहेत.

बागणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संभाजी कचरे, सागर खोत व वैभव शिंदे अशा तिरंगी लढतीत कचरे यांनी बाजी मारल्यावर शिंदे यांना हा पराभव जिव्हारी लागला व त्यातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आष्टा येथे अप्पर तहसिल कार्यालय आणण्यासाठी त्यांनी तत्कालिन सत्तारुढांकडे पाठपुरावा केला होता. तुर्तास तालुक्यातील भाजपअंतर्गत गटातटाचा लाभ उठवत भाजपला हादरा देण्याचा राष्ट्रवादीचा ‘कार्यक्रम’ सुरू झाल्याचे दिसत आहे.

Back to top button