पुणे; पुढारी वृत्तसेवा: सातत्याने सुरू असलेल्या वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणामुळे तसेच मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांमुळे धो-धो पावसातही पूर्वीच्या तुलनेत उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे 4 हजार 275 महिला व पुरुष अभियंते, कर्मचारी तसेच दुरुस्ती कामांसाठी नेमण्यात आलेले कंत्राटदार व कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध धोके पत्करून व सुरक्षेची काळजी घेत अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान, मुसळधार पाऊस व अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कालावधी कमीत कमी असावा व त्यासाठी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे कामदेखील लवकरात लवकर करण्यात यावे, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंडलनिहाय शाखा अभियंत्यांपर्यंत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
भरपावसातही अविश्रांत दुरुस्ती
सध्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेवर झाडे व फांद्या पडणे, पाणी साचणे आदी विविध प्रकारांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. मात्र महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामुळे होतो वीजपुरवठा खंडित
प्रामुख्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने त्याचे परिणाम पावसाळ्यात दिसत आहेत. तसेच काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्राँक्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे.