

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: पहाटेपासून कोसळणार्या पावसात सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर गुरुवारी (14) सकाळी पुन्हा दरड कोसळली. प्रशासनाने गडावर पर्यटनास बंदी केल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रस्त्यावर कोसळलेला दरडीचा काही मलबा, दगड वनविभागाने बाजूला केला आहे. अतिवष्टीमुळे दरड काढण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे उद्या दरड व इतर उन्मळून आलेल्या दरडी बाजूला करण्यात येणार आहेत. जगताप माचीजवळील घाट रस्त्यावर सकाळी दरड कोसळली. गड बंद असल्यामुळे पर्यटकांची वर्दळ नव्हती.
सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या दरडीच्या दगड, मलबा दूर केला. पुणे (भांबुर्डा ) वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ म्हणाले, "दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू असलेल्याने सिंहगड घाट रस्त्यावर सूचनाफलक लावण्यात येणार आहे. दरडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली आहे."
सिंहगडाच्या तिन्ही मार्गांवर नाकाबंदी अतिवृष्टीमुळे आजपासून रविवारपर्यंत सिंहगडावर प्रशासनाने मनाई केली आहे. गडावर जाणार्या घाट रस्त्याच्या डोणजे, गोळेवाडी व अवसरवाडी मार्गावर तसेच आतकरवाडी पायी मार्ग या तिन्ही मार्गांवर सकाळपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. येथून पर्यटकांना माघारी पाठवले जात आहे. त्यामुळे आज गडावर शुकशुकाट होता. तिन्ही नाक्यांवर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.