नवी मुंबईत पावसाचा जोर कायम; गेल्या २४ तासात ८४.६८ मिमी पावसाची नोंद | पुढारी

नवी मुंबईत पावसाचा जोर कायम; गेल्या २४ तासात ८४.६८ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : नवी मुंबईत गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या २४ तासात नवी मुंबईत सरासरी ८४.६८ मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

एपीएमसी मसाला मार्केटमधील सखल भागात मध्ये दरवर्षी पाणी साचण्याची घटना घडतात. पावसाचा जोर कायम असल्याने येथे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. तसेच महापे एमआयडीसी ते इंदिरा नगर भागातील ११ ठिकाणी पाणी साचले आहे. येथील मार्गावर खड्डे पडल्याने पाण्यातून रस्ता शोधताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. ठाणे बेलापूर आणि सायन पनवेल महामार्गावरही काही सखल भागात पाणी साचले. यामुळे महामार्गावरून धिम्यागतीने वाहतूक सुरू आहे. गेल्या २४ तासात नवी मुंबईत सरासरी ८४.६८ मिमी पाऊस झाला. दोन ठिकाणी झाडे कोसळली तर एका ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. मोरबे धरण क्षेत्रात ९२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरणाची पातळी ७६.५७ मीटरपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक पाऊस कोपरखैरणे येथे १०३.२० मिमी एवढा झाला. तर बेलापूर ७५.७० मिमी, नेरूळ ६८.४० मिमी, वाशी ७८.४० मिमी, ऐरोली ९३.२० मिमी आणि दिघा विभागात ८९.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button