Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर राऊतांचा हल्लाबोल | पुढारी

Sanjay Raut : गद्दारांना हायकमांड मानणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवर राऊतांचा हल्लाबोल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

अमित शहा यांनी 2019 मध्ये शब्द पाळला नाही. तो पाळला असता तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. शहांमुळेच एकनाथ शिंदे यांची संधी हुकली. आता त्यानांच हायकमांड मानून शिंदे दिल्लीत गेले आहेत. दिल्लीला मुंबई फोडायची असल्याने त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. गद्दारांना हायकमांड मानणा-यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असा हल्लाबोल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर टीका केली. संजय राऊत हे सध्या नाशिक दौ-यावर आहेत. आज त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी राऊत म्हणाले, शहांनी शब्द मोडला त्यावेळी या 40 जणांचा आत्मा जागा झाला नाही. ईडीमागे लागली म्हणून पाठीत खंजीर खुपसणारे आम्ही नाहीत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने छातीचा कोट करुन उभे राहिलो. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांचे करिअर संपले हा इतिहास आहे, असे सांगताना संजय राऊत यांनी छगन भुजबळ व नारायण राणे यांची उदाहरणे दिली. शिवसेना सोडली तेव्हा भुजबळ व राणे हारले व त्यांच्या मागे जे गेले तेही हारले. 40 आमदार म्हणजे शिवसेना नव्हे, उद्धव ठाकरे आजारी असताना भाजपशी हातमिळवणी केली. अशावेळी शिवसेना दुपट्टीने लढते हा इतिहास असल्याचे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले,  नुसता फोटो लावून बाळासाहेबांचे होता येत नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती म्हणून त्यांनी कोट्यावधी रुपये देऊन आमदार फोडले असा आरोप राऊत यांनी केला. बंडखोरांनी खोकं घेतलं म्हणजे त्यांना शांत झोप लागणार नाही. शिवसेना ही केवळ पोटावर नाही तर ती निष्ठेवर चालते. नाशिक ही पवित्र भूमी आहे, विकले गेलेल्यांची ही भूमी कधीच होऊ शकत नाही असे संजय राऊत म्हणाले. आजपासून पक्षाच्या कामाला सगळ्यांनी जोरदार सुरुवात करा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीश ठामपणे उभे राहा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Back to top button