ठाण्यात ११० किलोचा ११ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक | पुढारी

ठाण्यात ११० किलोचा ११ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : परराज्यातून विक्रीसाठी ठाण्यात आणलेला तब्बल 110 किलो गांजा गुरुवारी रात्री ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पोलिसांनी कापूरबावडी येथे पकडला. एका टेम्पोमधून या गांजाची तस्करी करण्यात येत होती. पोलिसांनी टेम्पोसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात टेम्पो चालकास अटक करण्यात आली आहे. अंबलाल जगदीश जाट (काल्हेर, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा गांजा ठाण्यात कोणाला सप्लाय करण्यात येणार होता व तो कोठून आणण्यात आला होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गांजा घेऊन ठाण्यात एक टेम्पो कापूरबावडी नाका येथून येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना गुप्त बातमीदारकडून मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार पोलीस पथकाने गुरुवारी रात्री 9.10 वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी येथील भिवंडीकडून ठाण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ सापळा लावला.

यावेळी घटनास्थळी एका निळ्या रंगाच्या टेम्पोवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी या टेम्पोला घेराव घालून त्यास अडवले आणि त्याची तपासणी केली असता, त्यात 11 गोण्यात गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी गांजा व टेम्पो जप्त केला. यावेळी टेम्पोमध्ये तब्बल 110 किलो गांजा मिळून आला. या गांजाची किंमत 11 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी संगितले.

गांजा व टेम्पोसह पोलिसांनी 16 लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. तर टेम्पो चालक अंबलाल जगदीश जाट यास अटक केली आहे. अटकेतल्या आरोपीस शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कोणाला सप्लाय करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button