श्रीलंकेतील संघर्ष टोकाला! आंदोलकांनी घेरल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचे निवासस्थानातून पलायन

श्रीलंकेतील संघर्ष टोकाला! आंदोलकांनी घेरल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचे निवासस्थानातून पलायन

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती अजूनही नियत्रंणात आलेली नाही. दरम्यान, शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात आंदोलकांनी प्रवेश करुन त्यांना घेराव घातला. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना त्यांचे निवासस्थान सोडून पळावे लागले असल्याचे वृत्त आहे. श्रीलंकेत सरकारविरोधात निर्दशने सुरुच आहे. आज शनिवारी देखील हजारो लोक कोलंबोतील रस्त्यावर उतरले. आज आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात धडक दिली.  यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली.

शनिवारी श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले आहेत. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. २ कोटी २० लाख लोकसंख्या असलेली श्रीलंका परकीय चलनाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत आहे. येथे इंधन, अन्न आणि औषधांची आयात मर्यादित होत आहे. श्रीलंका गेल्या सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटात बुडाली आहे.

शनिवारी आंदोलकांनी हातात काळे ध्वज आणि राष्ट्रध्वज घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपतींच्या विरोधात त्यांनी "गोटा गो होम" (Gota go home) अशा घोषणा देत राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला. आंदोलक मोठ्या संख्येने उतरून आंदोलन करणार असल्याने श्रीलंकेतील अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत शुक्रवारी रात्री ९ पासून पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. नेगोंबो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लाविनिया, कोलंबो उत्तर, कोलंबो दक्षिण आणि कोलंबो सेंट्रल भागात पोलिसांनी कर्फ्यू लागू केला आहे. जो कोणी कर्फ्यचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या श्रीलंकेमध्ये अराजक परिस्थिती आहे. अन्नधान्याची प्रचंड टंचाई, राक्षसी पातळीवर पोहोचलेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यांसारख्या मूलभूत पातळीवरील समस्यांमुळे श्रीलंकेतील जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार माजवत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news