यशोमती ताईंच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

यशोमती ताईंच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका : खासदार सुप्रिया सुळे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सहकार्य करीत नाहीत. असे जरी यशोमती ताई म्हणाल्या असल्या तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बालविकास संगोपन निधीसाठी पाच लाख रुपयांचा निधी महाविकास आघाडी सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने दिला होता. बालविकास संगोपन निधीला आणखी पैशाची गरज असेल तर ती नक्कीच पूर्ण केली जाईल. महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बालकांबाबत संवेदनशील आहेतच. त्यामुळे यशोमती ताई यांनी केलेली मागणी नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

बाल संगोपन निधीसाठी प्रतिबालक अडीच हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी अर्थमंत्र्यांकडे केली होती. मात्र या मागणीबाबत अर्थमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नसल्याने त्याबाबतचा जाहीर उच्चार ठाकूर यांनी अकोला येथील सभेत केला होता.

तसेच या संदर्भात काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी तक्रारी वजा सूर लावला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केवळ निधीसाठी मागणी केली आहे. त्यांच्याबाबत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे मतभेद अथवा रोष नाही. एक पालक गमावलेल्या बालकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.

राज्यात एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 17 हजार 845 इतकी आहे. यामध्ये पुणे विभाग सर्वाधिक चार हजार 192, कोकण विभाग चार हजार 138, नागपूर विभाग 3713 आणि नाशिक विभाग 2870 इतकी संख्या आहे. त्यामुळे त्याबाबत ठाकुर आगृही असल्यानेच त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मात्र यामुळे महाआघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा बेबनाव नसल्याचे काँग्रेसनेही स्पष्ट केले आहे.

हे ही वाचलत का ?

कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप

Back to top button