गणेश चतुर्थी : कोकणवासियांसाठी ‘मोदी’ एक्सप्रेस धावणार! | पुढारी

गणेश चतुर्थी : कोकणवासियांसाठी 'मोदी' एक्सप्रेस धावणार!

मुंबई, पुढारी ऑनलाईन : गणेश चतुर्थी निमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ‘मोदी’ एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही घोषणा केली आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मोदी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी  हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे. यासंदर्भात नितेश राणे म्हणाले की, “दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत.”

“नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थी साठी मोदी एक्सप्रेस सोडत आहोत”, अशी माहिती नितेश राणे ट्विटरवरून दिली आहे.

१८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. प्रवासात एक वेळचं जेवणदेखील दिलं जाणार आहे.

मोदी एक्सप्रेससाठी बुकिंग कसं करणार?

बुकिंगसाठी प्रवाशांना नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणि अमोल तेली, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्त्री आणि संतोष कानडे यांना २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे.

पहा व्हिडीओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button