उद्धवना ‘माफिया’ म्हणण्यास शिंदे गटाचा आक्षेप | पुढारी

उद्धवना ‘माफिया’ म्हणण्यास शिंदे गटाचा आक्षेप

मुंबई : पुढारी वृत्तसेवा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्‍लेख नेहमीप्रमाणे ‘माफिया’ असा केला आणि त्यास एकनाथ शिंदे गटाने तीव्र आक्षेप घेऊन मोठा धक्‍का दिला. सोमय्या यांनी गुरुवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि या भेटीचा फोटो ट्विट करीत लिहिले- मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री हटवल्याबद्दल अभिनंदन केले.

या ट्विटला तीव्र आक्षेप घेत शिंदे गटाचे प्रवक्‍ते आ. दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये. केसरकर यांनी सांगितले की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा अन्य कोणत्याही नेत्यांच्या बाबतीत अशी वक्‍तव्ये करण्यात येऊ नयेत, अशी विनंती आम्ही मुंबईत परतल्यानंतर झालेल्या पहिल्या बैठकीत केली होती व ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली होती. जे ज्येष्ठ नेते असतात त्यांच्याबद्दल काहीही वक्‍तव्ये करू नयेत, अशी सूचना त्यांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांना केली होती. मात्र आज जे घडले त्याबद्दल आम्ही फडणवीस यांना सांगू. सोमय्या हे भाजप नेते आहेत. त्यांना फडणवीस काय ते सांगतील. मात्र जे घडले ते आम्हाला कुणालाही आवडलेले नाही.

हेही वाचा

Back to top button