व्हीप मोडणाऱ्यांविरोधात कारवाई होणार : आदित्य ठाकरे | पुढारी

व्हीप मोडणाऱ्यांविरोधात कारवाई होणार : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आज (दि.४) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकत बहुमत सिद्ध केले. शिवसेनेने आमदारांसाठी व्हीप जारी केला होता; परंतु ज्या आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे शिवसेना कधीही संपणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे चाळीस आमदार शिंदे गटात गेल्यामुळे हा पक्ष संपल्याच्या निव्वळ वलग्ना आहेत. शिवसेना कधीच संपणार नाही. बंडखोरी करणाऱ्यांपैकी १६ आमदारांना पक्षाने निलंबित केले आहे. याबाबतची ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आम्ही तेथे दाद मागणार असल्याचेही आदित्य म्हणाले.

बंडखोर आमदार जेव्हा जनतेला भेटतील, तेव्हा पाहू, जनतेचा सामना ते कसा करणार, हेही पाहू. २० मे रोजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होणार का म्हणून माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली होती; परंतु त्यांनी वेगळी भूमिका घेतली. शिवसेनेतील बंडाळीमुळे शिवसेना संपणार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत ठाकरे यांना विचारले असता त्यांनाही मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

शिवसेनेने प्रतोद म्हणून निवड केलेले सुनील प्रभू म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे व प्रतोद भरत गोगावले यांच्या निवडीला दिलेली मान्यता हा लोकशाहीचा खून आहे. विधिमंडळाच्या कामकाजाला छेद देऊन सध्या काम सुरू झाले आहे. चाळीस आमदारांनी पक्षांतर केले आहे. गट म्हणून त्यांना बसता येणार नाही. कोणत्याही एका राजकीय पक्षात त्यांचे विलीन होणे आवश्यक होते. मात्र, लोकशाहीची पायमल्ली करून विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, असा आरोप प्रभू यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button