अशा पद्धतीने परत याल, असे वाटले नव्हते: बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला | पुढारी

अशा पद्धतीने परत याल, असे वाटले नव्हते: बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येणार… मी पुन्हा येणार… असा नारा दिला होता. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते अशा पद्धतीने येतील, असे वाटले नव्हते, अशा खोचक टोला काँग्रेस नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (दि. ४) लगावला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर थोरात बोलत होते.

थोरात पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीमत्व आहे. तळागाळात काम करून ते मुख्यमंत्रिपदावर पोहोचले आहेत. हे कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस, समाजासाठी काम करणारा तरूण कार्यकर्ता आपल्या कर्तृत्वाने सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचतो, हे प्रेरणादायी आहे. शिंदे यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. सत्ता मिळाल्याचा आनंद मोठा असतो, पण जबाबदारीही विसरू नका, असा सल्ला यावेळी थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. चांगले काम अडचणीत आणते, असे सांगत त्यांना फडणवीस यांनाही टोला लगावला.

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होईल, याची कल्पनाही केली नव्हती. आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. पण शिवसेनेने पुढाकार घेतल्याने महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. एक पक्षाच्या सरकार असताना कुरबुरी असतात. तरीही आम्ही तीन पक्षांचे सरकार चांगल्या प्रकारे चालवून दाखविले, एकमेकांना सांभाळून घेत राज्यकारभार केला. राज्यात आर्थिक संकट असतानाही सर्व प्रकल्प सुरु ठेवले. कोस्टल रोड, मेट्रो, विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यात विजेचे संकट मविआ सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळले. अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा संकटात सरकार उभे राहिले. आरेमध्ये पुन्हा मेट्रोचे कारशेड करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. परंतु हा निर्णय घेताना पर्यावरणाचा विचार करा, असेही थोरात म्हणाले.

मविआ सरकार आल्यानंतर लगेच राज्यावर कोरोनाचे संकट आले. कोरोनाच्या संकट काळात मविआचे काम कौतुकास्पद झाले. राज्य सरकारच्या कोरोना नियंणाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. सामान्य नागरिकही आमचे सरकारचे काम विसरणार नाहीत, असेही थोरात म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. तुमच्या सत्तेच्या खेळामुळे सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप थोरात यांनी शिंदे सरकारवर केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button