मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभा सभागृहात मांडला. शिवसेनेचे आमचे मुख्यमंत्री अशी सुरुवात करत फडणवीसांनी भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. विश्वासदर्शक ठराव जिकल्यानंतर फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. काल तुम्ही सुट्टी मागत होता. आता आम्ही प्रचंड मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आता विरोधी पक्षांच्या सदस्यांना सुट्टी मिळेल, असा विराेधी पक्षांच्या सदस्यांना टाेला लगावत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस बाेलताना विजय वडेट्टीवार बाेलले. 'वडेट्टीवारजी अभिनंदन तर करू द्या,' असे फडणवीस म्हणाले. तसेच सरकारवर विश्वास दर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला. यासाठी सर्वांचे कष्ट आणि सर्वांचे आभार त्यांनी मानले. प्रस्ताव पारित होण्यासाठी जे अप्रत्यक्षपणे मेहनत घेतली, त्यांचेही फडणवीस यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे य़ांचे स्मरण करत ते कुशल संघटक होते, असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
शिंदेंनी समृध्दीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले. ४ वेळी पाचपाखाडीमधून विधानसभेवर गेले. समृध्दी महामार्गात शिंदेंची अमूल्य भूमिका आहे. शिंदेंचा युतीचे मुख्यमंत्री असा उल्लेख फडणवीसांनी केला.
फडणवीस म्हणाले- एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत. एमएसआरडीसी खात्यात चमक दाखवली. पद-प्रतिष्टा मिळवूनही शिंदेंमध्ये प्रचंड माणुसकी आहे. एकनाथराव शिंदे वेगळं रसायन आहे. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री एक वेगळा प्रवास एकनाथ शिंदेंचा आहे. ज्याला कुणी नाही त्याला दिघेसाहेब. हाच गुण शिंदे यांनी दिघेंकडून घेतला. शिंदेंनी आंदोलकांना कधीही विरोधक मानलं नाही. सीमालढ्यातही शिंदेंचा सक्रिय भाग होता. समृध्दी महामार्गाचं सगळं काम शिंदे यांनी केलं. शिंदेसोबत आता मीही २४ तास काम करेन.
आजही शिंदे रोज ५०० लोकांना भेटतात. वैयक्तिक आयुष्यातही अडचणी येऊनही शिंदे खंबीर बनले. बेल्लारीच्या तुरुंगात त्यांनी ४० दिवस त्यांनी काढले. मी पुन्हा येईन, यावर टिंगल टवाळी झाली. आणि मी आलो आणि शिंदेंना सोबत घेऊन आलो. हरेक का मोका, अशा गोष्टी राजकारणात होणारचं. माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार. आणि मी त्यांना माफ करणे हाच बदला असेल. अशा शब्दांत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.