ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील | पुढारी

ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आज विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले. बांगर यांच्यासह आणखी एक आमदार श्यामसुंदर शिंदे विश्वासदर्शक ठरावापूर्वीच एकनाथ शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा आकडा ४१ झाला आहे. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे ३९ आमदार शिंदे गटात सामील झाले. पण संतोष बांगर ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले होते. त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात भूमिका घेतली होती. पण आज बहुमत चाचणीआधी त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि ते शिंदे गटात सामील झाले. ते आज शिंदे गटासोबत विधानभवनात दाखल झाले.

शिवसेनेशी ज्यांनी बेइमानी केली त्या आमदारांवर त्यांच्या बायकादेखील विश्वास ठेवणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य संतोष बांगर यांनी केले होते. उद्धव ठाकरेंसोबत ते एकनिष्ठ राहिल्याने त्यांचा हिंगोली जिल्ह्यात सत्कारदेखील करण्यात आला होता.

रविवारी विधानसभा अध्यक्ष निवड झाल्यानंतर आज सोमवारी शिंदे- फडणवीस सरकारची (Shinde and Fadnavis led Maharashtra govt) विधानसभेत बहुमत चाचणी (Maharashtra floor test) होत आहे. काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले. त्यांना १६४ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत त्यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नव्हता.

दरम्यान, शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांचे गटनेतेपद आणि सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोदपदही रद्द ठरवले आहे. परिणामी, आज सोमवारी होणार्‍या शक्‍तिपरीक्षेत शिंदे गटाच्या आदेशानुसार शिवसेनेला सरकारच्या बाजूनेच मतदान करावे लागेल. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसह सेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाचाच व्हिप बंधनकारक राहील. अन्यथा त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.

Back to top button