विधानसभा अध्यक्ष निवडणूक : ‘मविआ’चा उमेदवार अखेर ठरला, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भरला अर्ज | पुढारी

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 'मविआ'चा उमेदवार अखेर ठरला, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भरला अर्ज

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी आज अर्ज भरला. साळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत. तर राहुल नार्वेकर यांनी काल भाजपकडून अर्ज दाखल केला होता. यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना होणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक उद्या ३ जुलै रोजी होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने मुंबईतील कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज महाविकास आघाडीकडून अखरेच्या काही क्षणात राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जानेवारी २०२१ मध्ये अध्यक्षपद सोडले होते. तेव्हापासून हे पद रिक्‍तच होते. अर्ज भरण्याची मुदत शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. त्यापूर्वी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्‍त मतदानाने न होता खुल्या पद्धतीने व्हावी, असा नियमात बदल केला होता. मात्र, तो लागू झालेला नाही.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियम समिती नेमण्यात आली होती. या समितीत भाजपचे सुधीर गाडगीळ व जयकुमार गोरे, शिवसेनेचे दीपक केसरकर आदी सर्वपक्षीय सात सदस्य होते. समितीने आपला अहवाल जुलै २०२१ मध्ये सादर केला होता. मात्र, ‘मविआ’ला त्या बदललेल्या नियमाखाली निवडणूक घेता आली नाही. आधी हा नियमबदल घटनेला अनुकूल नाही, अशी हरकत घेतली गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. गिरीश महाजन यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेसाठी हा विषय थांबला होता.

विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवारी आणि सोमवारी होणार आहे. रविवारी ११ वाजता कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईल. आवाजी मतदानाने तसेच नियमानुसार उभे राहून मतविभागणी केली जाईल. ज्या उमेदवाराचा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल, ते अध्यक्ष नियुक्‍त होतील.

Back to top button