पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील ९ दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.
पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हाेतील, अशी घाेषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हाेईल. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, अपक्ष आणि भाजपचे लोक या मंत्रीमंडळात असतील. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही. मी स्वत: बाहेर असने; पण सरकार व्यवस्थित चालविण्याची जबाबदारी माझ्यावरही असेल, माझे पूर्ण पाठबळ या सरकारला असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घाेषणा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान माेदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेच्या नेतृत्त्वाने युती केली आणि भाजपला सत्तेपासून बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी लढत नाही. ही तत्त्वाची लढाई आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलंत का ?