मुंबईकरांसाठी गुड न्यूज : तलाव क्षेत्रात पाऊस दाखल! पाणी साठ्यात वाढ | पुढारी

मुंबईकरांसाठी गुड न्यूज : तलाव क्षेत्रात पाऊस दाखल! पाणी साठ्यात वाढ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईकरांसाठी गुड न्यूज असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात 17 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मंगळवारी (दि.28) तलाव क्षेत्रात 1 लाख 30 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा बुधवार सकाळी सहावाजेपर्यंत 1 लाख 47 हजार दशलक्ष लिटरपर्यंत पोहचला आहे.

काही दिवसापासून पावसाने लपंडाव सुरू होता. मात्र आता गुरुवारपासून मूसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत मान्सून दाखल झाला आहे असे हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. यामूळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातही बरसात सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे. तसेच जोरदार पाऊस पडून तलावातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

मुंबईमधील सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते. या सर्व तलावांपैकी विहार व तुळशी हे मुख्य दोन तलाव पूर्व उपनगरमध्ये असून उर्वरित पाच तलाव हे ठाणे जिल्हात आहेत.

हेही वाचा 

Back to top button