हॅकरने उडवले डोंबिवलीकर उद्योजकाचे 3.55 लाख | पुढारी

हॅकरने उडवले डोंबिवलीकर उद्योजकाचे 3.55 लाख

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
आधुनिक तंत्राचा वापर करून हॅकरने डोंबिवलीकर उद्योजकाची 3 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली असून या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. रविकिरण रमाकांत सावंत (52) असे या उद्योजकाचे नाव असून ते डोंबिवली पूर्वेकडील विर
सावरकर रोडला असलेल्या राधाश्री सोसायटीत राहतात. पुण्याच्या अ‍ॅक्सिस बँकेतील सुमीत नावाच्या इसमाच्या बँक खात्यावर उद्योजक रविकिरण यांचे पैसे वळविण्यात आले आहेत. उद्योजक रविकिरण सावंत यांना त्यांच्या कल्याण-शिळ मार्गावरील श्री साई वर्क्स कंपनीतील उत्पादनासाठी लागणारे फॅब्रिकेशनचे साहित्य पुण्यातल्या हालक्यॉन टेक्नॉलॉजिज कार्पोरेशन कंपनीकडून मागवायचे होते. या साहित्याची खरेदी किंमत 3 लाख 55 हजार रुपये होती. रविकिरण यांचे बँक खाते डोंबिवलीतीलएका बँकेत आहे. त्यांनी बँकेतून ऑनलाईन पध्दतीने हालक्यॉन कंपनीच्या पुणे येथील बँक खाते असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेत 3 लाख 55 हजार रुपये भरणा केले. हा ऑनलाईन व्यवहार होत असताना हॅकर्सने रविकिरण यांचा ई-मेल व्यवहाराचा पत्ता हॅक केला. रविकिरण यांनी हालक्यॉन कंपनीला पाठविलेली 3 लाख 55 हजार रुपयांची रक्कम स्वताच्या सुमीत नावाने खाते असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेत वळती केली. सावंत यांनी पुण्यातल्या सदर कंपनीशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे समजले. सावंत यांनी या प्रकरणी मानपाडा
पोलीस ठाण्यात तक्रार केली असून गुन्हा दाखल करून फौजदार पी.बी. गायकवाड तपास करत आहे

Back to top button