

नाशिक (विंचुरी दळवी): पुढारी वृत्तसेवा
विंचुरी दळवी पांर्ढुली रस्त्यावरील भोर मळा येथे पहाटे 3.30 वाजेला चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. भोर मळा येथील रहिवासियांनी या चोरांना पकडले व पोलिसांच्या हवाली केले.
सुरवातीला चोरट्यांनी गावाजवळील कानडे मळा येथील कल्पेश कानडे यांच्या ट्रक्टरच्या ट्रालीचे फाळके चोरले. नंतर भोर मळा येथे त्यांनी आपला मोर्चा वळवला तीथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या बॅटरी व टायर व ट्रालीचे फाळके काढण्याच्या तयारीत असताना अचानक आवाज झाला. त्यामुळे घराच्या खिडकीजवळच झोपलेल्या दत्तु रामा भोर यांना जाग आली. त्यांनी घराच्या बाहेर धाव घेतली तेव्हा चोरटे प्रतीकार करण्याच्या तयारीत होते. परंतु प्रसंगसावधान राखून भोर यांनी घरातील सर्वांना जागे केले. तेव्हा चोरट्यांनी चोरलेल्या वस्तु जागेवर टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. भोर यांनी घरातील व शेजारच्यांच्या मदतीने पाठलाग करुन चोरांना घोरवड घाट येथे पकडले व घराजवळ आणून दोरीच्या सहाय्याने बांधुन ठेवले.
हे सर्व चोरटे भगुर येथील असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. ते 20 ते 22 वर्ष वयाचे असल्याचे समजते. सदरची माहीती सिन्नर पोलीसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या चोरांचे आणखी कोणी सहकारी आहेत का याचा तपास सुरु आहे.