Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासह ९ बंडखोर मंत्र्यांची खाती काढली | पुढारी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासह ९ बंडखोर मंत्र्यांची खाती काढली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ५ मंत्री आणि ४ राज्यमंत्र्यांकडील खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली. ही खाते इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम ६ -अ मध्ये जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल, तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देश देता येतात, अशी तरतूद आहे. त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण संजय बनसोडे यांच्याकडे, विश्वजित कदम यांच्याकडे वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, तर सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्रीपद देण्यात आले आहे.
राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते विश्वजित कदम यांच्याकडे, वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग खाती प्राजक्त तनपुरे यांचेकडे, अन्न व औषध प्रशासन विभाग सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे, तर सांस्कृतिक कार्य खाते आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार यांच्याकडील महसूल खाते प्राजक्त तनपुरे, ग्राम विकास खाते सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे, तर बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाती आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहेत.
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण विभाग आदिती तटकरे, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार विभाग सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्याकडे, महिला व बाल विकास संजय बनसोडे, तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button