गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई | पुढारी

गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

मुंबई  : पुढारी वृत्तसेवा  सध्या गुहावाटीत असलेले महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच आहोत. आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही’.असे म्हटलं आहे.

राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्हीच पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही. असेदेखील ते म्हणाले.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी तेथील कार्यक्रमात दिली होती. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने त्या निर्णयाची मी विधान परिषदेत घोषणा केली होती. यासाठी 5 कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत.

आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा. म्हणूनच एक स्पष्ट भूमिका घेण्याची विनंती आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला. आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून, सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी, अशी माझी शिवसैनिकांना विनंती आहे. असे अवाहनही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

हेही वाचा

Back to top button