पुणे महापालिकेची सुरक्षा आता भाजप नेत्याच्या हाती! | पुढारी

पुणे महापालिकेची सुरक्षा आता भाजप नेत्याच्या हाती!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेला खासगी सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठीचे काम एका भाजप नेत्याच्या कंपनीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने मागविलेल्या या निविदा प्रक्रियेत हीच कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने भरलेले दरही सर्वात कमी आलेत आहेत.

महापालिकेच्या मिळकतींच्या सुरक्षिततेसाठी कायम स्वरुपी सुरक्षा रक्षकांची संख्या ६६६ इतकी आहे, त्यामधील ३२१ पदे रिक्त असून फक्त ३४५ सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे पालिकेकडून कंत्राटी पध्दतीने १ हजार ५८० इतके सुरक्षा रक्षक भरले जातात.

त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, हे काम भाजपच्या एका नेत्याच्या कंपनीला मिळावे यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आले होते. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

दरम्यान या कामासाठी सहा कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यामधील चार कंपन्या अपात्र तर दोन कंपन्या पात्र ठरल्या. त्यांच्या निविदांचे दर (ब पाकिट) उघडण्यात आल्यानंतर मुंबईतील एक कंपनीचे दर अन्य निविदा धारकांपेक्षा सर्वात कमी म्हणजेच, प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा ९.७० रुपये इतक्या वाढीव दराने आले आहेत.

त्यामुळे याच कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासंबधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकित पुढील आठवड्यात मंजुरीसाठी येणार आहे.

महापालिकेवर अतिरिक्त बोजा

सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम एकूण ४२ कोटी २० लाख रुपयांच्या रक्कमेचे आहे. मात्र, या कामाच्या पुर्वीच्या निविदा फक्त १ रुपया अधिक दराने होते. आता मात्र, या निविदा ९. ४५ रुपये इतक्या दराने आल्या आहेत. त्यामुळे हे काम ५० कोटींच्या पुढे जाणार असून त्याचा अतिरिक्त बोजा पालिकेवर पडणार आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

Back to top button