

मुंबई : पुढारी वृत्तसेवा;
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली असून, शिवसेनेने शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवत पुढच्या लढाईच्या दृष्टीने सहा महत्त्वाचे ठराव मंजूर केले. या ठरावानुसार बडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने दिले आहेत. बैठकीनंतर बंडखोरांवर संध्याकाळपर्यंत कारवाई होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले. जे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत त्यांची मंत्रिपदे काढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शक ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला. तसेच त्यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वासदेखील राष्ट्रीय कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला आहे.
ठराव क्रमांक पाचमध्ये शिवसेना हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी कधीही प्रतारणा करणार नाही. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे यापुढेही शिवसेनेचे धोरण राहील, असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच ज्यांनी शिवसेनेशी बेइमानी केली ते कोणत्याही पदावर असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला असून, कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत.
शिवसेनेने ठराव क्रमांक सहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अन्य कोणत्याही संघटनेला वापरता येणार नाही हे नाव शिवसेनेसोबत राहील. कोणालाही ते वापरता येणार नाही ,असा ठराव करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे जास्तच आक्रमक झाले होते. तुम्हाला जर मते मागायचे असतील तर तुमच्या बापाच्या नावावर मागा. आमच्या बापाच्या नावावर मते मागू नका, असा सज्जड इशारा त्यांनी बंडखोरांना दिला.
या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, आता कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. सेना कुठेही कमी पडणार नाही. दोन्ही लढाईत आमचाच विजय होईल. जे काही बंडखोर आहेत त्यांच्यावर आज संध्याकाळी कारवाईचे संकेत तुम्हाला मिळतील. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचे नाव वापरू देऊ नका- शिवसेना पाठविणार निवडणूक आयोगाला पत्र शिवसेनेच्या आमदारांना पळवून नेवून गुवाहतीमधून राजकारणाची सूत्रे हलविणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरू देऊ नका, अशी विनंती शिवसेनेच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाला केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
एक प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. शिवसेना वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीवेळी ते दिले जात नाही. मात्र, शिवसेनेत बंडखोरी झाली असल्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना या नावाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हसुद्धा त्यांच्या गटाच्या नावाने आयोगाकडे नोंदणी करण्याची मागणी करू शकतात. यामुळे बंडखोरांनी शिवसेनाप्रमुख आणि निवडणूक चिन्हाचा वापर करू नये, यासाठी शिवसेनेने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.
हेही वाचा :