शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा | पुढारी

शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटिसा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या अन्य आमदारांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर बनली आहे. तर शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना आज (दि.२५)  नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसाला उत्तर देण्यासाठी २७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी संपुष्टात येण्याची आशा पूर्णपणे मावळल्याने राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला असून, ही लढाई आता कायदेशीर वळणे घेऊ लागली आहे. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्‍तीला मान्यता देत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला पहिला धक्‍का दिला. पाठोपाठ १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटीसा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पाठवल्या आहेत.

दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केली आणि त्यांच्या जागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्‍ती केली होती. यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदे यांनी 37 आमदारांच्या सहीने आपणच गटनेते असल्याचा दावा केला होता. असे असताना शिवसेनेचे अजय चौधरी व सुनील प्रभू यांच्या नियुक्‍तीवर झिरवाळ यांनी शिक्‍कामोर्तब केले. या नव्या नियुक्त्यांना उपाध्यक्षांनी मान्यता दिल्याचे पत्र विधिमंडळाने जारी केली.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button