पंचतारांकित हाँटेलमध्ये करोडोंचा चुराडा; बंडखोरांवर सुप्रिया सुळे यांची टीका | पुढारी

पंचतारांकित हाँटेलमध्ये करोडोंचा चुराडा; बंडखोरांवर सुप्रिया सुळे यांची टीका

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: आसाम राज्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिल दिली जाताहेत हे योग्य आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे गटाला खा. सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात राजकारण तापलं असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनामधील एका गटाने बंड पुकारला आहे. त्यावरून बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुळे या शनिवार २५ जून रोजी इंदापूर दौऱ्यावर होत्या, भवानीनगर येथील छत्रपती मंगल कार्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

खासदार सुळे म्हणाल्या की,आसाममध्ये पूर आलाय तिथे मदत करायला गेले आहेत असं मला वाटलं, परंतु तिथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत. पेरणीचा काळ निघून चालला आहे, या काळात तुम्ही तुमच्या मतदार संघात नको का ? पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा तिथल्या लोकांना जाऊन मदत करावी. यासाठी यांना निवडून दिले आहे का? ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदार संघातील काम कोण करणार ? पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिल चालली आहेत हे योग्य आहे का? असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.

त्याबद्दल कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल…

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरुद्ध दोन अपक्ष आमदारांनी अविश्वास ठराव मांडला आहे. त्यामुळे त्यांना बंडखोरी करणाऱ्या सोळा आमदरांवर कारवाई करता येणार नाही असा त्यांचा दावा आहे. यानंतर नरहरी झिरवळ अडचणीत येऊ शकतील का? असा सवाल माध्यमांनी सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, मला याबद्दल माहित नाही त्यासाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, त्यातल्या तज्ञांना विचारावं लागेल.

इंदापूर आणि बारामतीत काय चाललं आहे हे मी सांगू शकते पणं…

लोकं आरोप करत राहतात. मला आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आमच्या मतदार संघात जबाबदाऱ्या आहेत.त्यामुळे बाकिचे काय बोलताहेत हे ऐकण्यासाठी आमच्या दोघांकडे फार कमी वेळ असतो. इंदापूरमध्ये काय चाललयं, कोण काय करतयं हे मी सांगू शकते पण बाहेरचं कसं सांगणार म्हणतं देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली हालचालींवर त्यांनी अधिकचं बोलणं टाळलं आहे.

Back to top button