एकनाथ शिंदे म्‍हणाले, अद्याप गटाचे नाव ठरले नाही, आम्‍ही शिवसेनेतच आहोत.. | पुढारी

एकनाथ शिंदे म्‍हणाले, अद्याप गटाचे नाव ठरले नाही, आम्‍ही शिवसेनेतच आहोत..

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. त्यामुळे आम्ही कोणताही स्वतंत्र गट केलेला नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांचा गट ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावाने गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावला. अद्याप कोणतेही नाव निश्चित केलेले नाही. जे काही ठरेल ते सांगू, असे शिंदे म्हणाले.

उध्दव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. तसेच गुवाहाटी येथे शिवसेना आमदारांना डांबून ठेवण्यात आल्याचाही आरोप केला होता. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, जे आमदार सोबत आहेत ते खुशीने आलेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुभव आला तो अनुभव घेऊन ते येथे आले आहेत. हे आमदार काही तीन चार लाख लोकांतून निवडून येतात, त्यांना त्यांचे काय बरे काय वाईट ते कळते. त्यांना फक्त शिवसैनिकांनी निवडून दिलेले नाहीत. लोकांनीही मते दिली आहेत. त्यांच्यासाठी निर्णय घेण्याचा आमदारांना अधिकार आहे, असे शिंदे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जे आमदार आले आहेत त्यांची संख्या अधिक आहे. आमचा दोन तृतीयांश संख्येचा गट तयार झालेला आहे. आमदारांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दिले आहे. व्हिडिओ जारी करत भूमिका मांडली आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या मर्जीने येथे आलेले आहेत. आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत या म्हणण्याला काही अर्थ नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

बंडखोर आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जे हल्ले होत आहेत. त्यावरही शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार असतील की सामान्य नागरिक असतील त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असते. ही जबाबदारी सरकारने योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचलंत का? 

Back to top button