Maharashtra Political Crisis : बंडाची सूत्रे भाजपकडे, शिवसेनेचे आमदार विशेष विमानाने आसामला होणार रवाना | पुढारी

Maharashtra Political Crisis : बंडाची सूत्रे भाजपकडे, शिवसेनेचे आमदार विशेष विमानाने आसामला होणार रवाना

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आपण कुणाशीही हातमिळवणी केलेली नाही, असे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना सांगितले असले तरी शिंदे यांच्या बंडाची सर्व सूत्रे भाजपच्या हाती असल्याचे चित्र मंगळवारी (दि.२१) रात्री स्पष्ट झाले. भाजपची सत्ता असलेल्या सुरतमध्ये बंडखोर आमदारांशी शिवसेनेचा संपर्क होऊ शकतो हे लक्षात घेऊन या सर्व आमदारांना आसाममध्ये गुवाहाटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मंगळवारी रात्री स्पाईस जेटचे खास विमान सुरतमध्ये दाखल झाले होते. (Maharashtra Political Crisis)

सोमवारी विधान भवनात विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच संध्याकाळी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसाठी मुंबईतून सुरतला जाणार्‍या विमानाचे बुकिंग करण्यात आले होते. विमान सुटण्याआधी विमानतळावर पोहोचणे धोक्याचे असल्याचे ओळखून मग शिंदे यांनी एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये आमदारांची व्यवस्था केली. विमान सुटण्याच्या काही वेळ आधी आमदारांनी हॉटेल सोडले. सर्वात आधी 11 आमदार सुरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले होते. (Maharashtra Political Crisis)

मतदान सुरू असतानाच काही बंडखोर आमदारांनी थेट ठाणे गाठले आणि ठाण्यातून त्यांना घेऊन बस घोडबंदर रोडवरून गुजरातच्या दिशेने निघाल्या. पालघरपर्यंत आमदारांमध्ये धाकधूक होती. पालघरला रात्री 11.30 वाजता पोहोचल्यानंतर पुढे कसे यायचे यासंदर्भातील सूचना गुजरात भाजपचे नेते आर. सी. पाटील व शिंदे यांचे निकटवर्तीय बस चालकाला देत होते. मध्यरात्री 12.30 वाजता पालघर ओलांडल्यानंतर बसला गुजरात पोलिसांच्या संरक्षणात सुरतमध्ये आणले गेले. (Maharashtra Political Crisis)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून आमदार रवींद्र फाटक, मिलिंद नार्वेकर सुरतच्या हॉटेलमध्येही दाखल झाले. त्यांच्या फोनवरून शिंदे आणि ठाकरे यांचे बोलणेही झाले. या सर्व हालचाली वाढल्या तर हे बंड थंड होऊ शकते, हे लक्षात घेऊन भाजपने या सर्व आमदारांना गुवाहाटीत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. आसाम हे ईशान्य भारतात मुंबईपासून कमालीचे म्हणजे तब्बल 2 हजार 700 किलोमीटर लांब असल्याने शिवसेनेचा बंडखोरांशी संपर्क होऊ शकणार नाही, असा विचार भाजपने केला असावा. आसाममध्ये भाजपचेच सरकार आहे.

सरकारचे संभाव्य चित्र (Maharashtra Political Crisis)

शिवसेनेत फूट पडल्यास
शिवसेना ः 25
राष्ट्रवादी ः 53
काँग्रेस ः 44
अपक्ष ः 16
एकूण ः 138

शिंदे गट भाजपसोबत गेल्यास
भाजप ः 106
शिंदे गट ः 30
अपक्ष ः 13
एकूण ः 149

Back to top button