विधान परिषद निवडणूक : जो २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट निश्चित : अजित पवार | पुढारी

विधान परिषद निवडणूक : जो २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट निश्चित : अजित पवार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनिती ठरलेली आहे. पण जो २६ चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट निश्चित आहे. चमत्कार कुणाच्या बाबतीत घडेल हे महाराष्ट्र पाहिल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी मते आहेत. पण राष्ट्रवादीच्या दोघा आमदारांना मतदानाची परवानगी नसल्याने मतं कमी पडत आहेत. त्यासाठी अपक्षांची मदत घेऊन कोटा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

मतांचा कोटा जास्त कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतं बाद होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. त्यासाठी आज सर्व आमदारांना मतदान कसं करायचं याबाबत मार्गदर्शन करु, असेही त्यांनी सांगितले.

आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीची एकजूट आहे. आम्ही एकमेकांना भेटत आहोत. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केले आहेत हे खरं आहे. मुख्यमंत्री सांगतील तसे आम्ही मतदान करु असे आमदारांनी सांगितले असल्याचे पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी सध्या देशभरात सुरु असलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलनात राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झाले आहे. पण राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करु नका, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले आहे.

काँग्रेसवर मुख्यमंत्री ठाकरे नाराज

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी १० मते कमी असून त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भाजपला मतदान केल्याने भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे भाई जगताप यांनी नुकतीच पहिली भेट हितेंद्र ठाकूर यांची घेतली. त्यांनी ठाकूर यांची तीनही मते देण्याची विनंती केली. मात्र ठाकूर यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने अतिरिक्त मते घेतली.

आपली मते शिवसेना उमेदवार संजय पवार यांना दिली नाहीत यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेना आपल्याकडे असलेल्या अतिरिक्त ८ ते ९ मतांमधून किती मते काँग्रेसला देईल याबाबत शंका आहे. त्यामुळे भाई जगताप यांनी अपक्षांशीही संपर्क सुरू केला असल्याचे समजते.

भाजपला आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त २२ मतांची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकीत लाड यांच्या विजयासाठीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button