विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत | पुढारी

विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होणार आहे. त्यामुळे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीत काँग्रेसला दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी 10 मते कमी असून त्यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भाजपला मतदान केल्याने भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय सुकर झाला. त्यामुळे भाई जगताप यांनी पहिली भेट हितेंद्र ठाकूर यांची घेतली. त्यांनी ठाकूर यांची तीनही मते देण्याची विनंती केली. मात्र ठाकूर यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने अतिरिक्त मते घेतली.

आपली मते शिवसेना उमेदवार संजय पवार यांना दिली नाहीत यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे यावेळी शिवसेना आपल्याकडे असलेल्या अतिरिक्त 8 ते 9 मतांमधून  किती मते काँग्रेसला देईल याबाबत शंका आहे. त्यामुळे भाई जगताप यांनी अपक्षांशीही संपर्क सुरू केला असल्याचे समजते.

भाजपला आपले पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त 22 मतांची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकीत लाड यांच्या विजयासाठीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. त्यांनी सागर बंगल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आदी नेत्यांसोबत बैठक घेतली.

 

Back to top button