विधान परिषदेतही धक्का देण्याची भाजपची रणनीती

विधान परिषदेतही धक्का देण्याची भाजपची रणनीती
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्यात यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला धक्का देण्याची रणनीती आखत आहे. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असून पक्षांनी व्हीप जारी केला तरी कोणी कोणाला मत दिले हे कळणार नसल्याने अपक्षांबरोबरच आपली मते फुटणार नाहीत, याची मविआला दक्षता घ्यावी लागणार आहे. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त मतदान असल्याने महाविकास आघाडीतील आमदारांची सद्सद्विवेकबुद्धी जास्त जागी होईल, असा इशारा दिल्याने महाविकास आघाडीपुढे आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. 'ये तो झाँकी है, विधान परिषद अभी बाकी है', असे खुले आव्हानच भारतीय जनता पक्षाने दिले आहे.

विधान परिषदेसाठी गुप्त पद्धतीने मतदान होते. त्यामुळे मविआच्या गोटातील चिंता वाढली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षातील आमदारांमध्येही नाराजी असून विधान परिषद निवडणुकीत त्यांची सद्सदविवेकबुद्धी जास्त जागी होईल, असे सांगत आघाडीच्या गोटातील चिंता जास्तच वाढवली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी र् मागे घेण्याची मुदत आहे. राज्यातील पक्षीय संख्याबळानुसार चार जागांवर भाजप, दोन जागांवर शिवसेना, दोन जागांवर राष्ट्रवादी आणि दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येणे अपेक्षित आहे. मात्र, भाजपने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही आक्रमक रणनीती आखली आहे. चार ऐवजी सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विधान परिषद निवडणुकीचा पॅटर्नही राज्यसभेप्रमाणेच आहे. या निवडणुकीतही पहिल्या आणि दुसर्‍या पसंतीच्या आधारे उमेदवारांची निवड होते. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांनी आकड्याच्या खेळात हातखंडा दाखवून दिल्याने महाविकास आघाडी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करते की निवडणूक रिंगणात उतरते हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

भाजपला हव्यात पाच जागा
या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यास भाजप किमान पाच जागा मागू शकते. त्यास महाविकास आघाडी तयार होते का, यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. भाजपने पाच जागांवर समाधान व्यक्त केल्यास अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले सदाभाऊ खोत हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात.

आघाडीतील घटक पक्षातील आमदारांमध्येही नाराजी असून विधान परिषद निवडणुकीत त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागी होईल.
– देवेंद्र फडणवीस

निवडणुकीत काही वेळ जिंकणे असते, तर काही वेळा हरणे असते. ज्या वेळेस एखादा उमेदवार विजयी होतो, त्यावेळेस तोच फॉर्म्युला योग्य असे सर्वांना वाटते. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचे चित्रपटही कधी कधी अपयशी ठरतात. मात्र, त्यानंतरही अमिताभ बच्चन हा बच्चनच असतो.
– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
—————————-
काही घोड्यावर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात. पण विकले जाणारे लोक कुणाचेच नसतात. ज्या 6 अपक्षांनी धोका दिला त्यांची नावे आमच्याकडे आहेत. आम्ही हरलो. पण भाजपने देदीप्यमान विजय मिळवला नाही.
-संजय राऊत, खासदार, शिवसेना
—————————-
बाळासाहेबांच्या आदेशाने पूर्वी सर्व घडत होते. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत, आपली माणसे प्रेमाने सांभाळावी लागतात. काही लोक स्वतःला पक्ष प्रमुख समजून पक्ष चालवत असल्याने हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
– बाळा नांदगावकर, मनसे नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news