संभाजीराजेंची माघार! पडद्यामागे नेमके काय घडले? | पुढारी

संभाजीराजेंची माघार! पडद्यामागे नेमके काय घडले?

मुंबई; दिलीप सपाटे : संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या रिंगणात उडी घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले खरे; पण खासदारकी द्यायची आणि पक्षाशी एकनिष्ठही राहायचे नाही ही त्यांची फटकून राहणारी कार्यपद्धती आधी भाजपला पटली नव्हती आणि आता शिवसेनेलाही पटणारी नव्हती. त्यामुळेच संभाजीराजेंनी केलेल्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या. शिवसेनेने संभाजीराजेंसोबत तहाचा मसुदाही तयार केला. पण अविश्‍वासाच्या वातावरणात झालेला हा तह अवघ्या काही तासांतच मोडीत निघाला आणि संभाजीराजेंना माघार घेणे भाग पडले.

संभाजीराजेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यसभेसाठी सहावी जागा अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केले होते. ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र ही भेटच महाविकास आघाडीत संशय निर्माण करणारी ठरली. या भेटीपूर्वी संभाजीराजेंनी शरद पवार, सोनिया गांधी यांच्याही भेटी घेतल्या होत्या. ते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्याशीही बोलले होते.

मात्र फडणवीस यांची भेट, त्यानंतर त्यांनी लगेच स्वतंत्र संघटना काढण्याची आणि त्या माध्यमातून राजकारण करण्याच्या केलेल्या घोषणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यामागे भाजपचे तिसरी जागा ताब्यात घेण्याचे राजकारण तर नाही ना, संभाजीराजेंनी निर्माण करू घातलेले ‘स्वराज्य’ उद्या आपल्यावर तर उलटणार नाही ना, अशी चर्चा महविकास आघाडीत दबक्या आवाजात सुरू झाली. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वरवर उमेदवारी देण्याचे संकेत देताना संभाजीराजे यांना खिंडीत गाठत त्यांचा राजकीय गेम केला.

शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेताना महाविकास आघाडीत दुसरी जागा शिवसेना लढणार असल्याचे तसेच शिवसेना ठरवेल त्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकून टाकली. पवार यांनी यावेळी दगडाखाली सापडलेला हात अलगदपणे काढून घेतला. तर त्यानंतर शिवसेनेने उमेदवारी देण्यासाठी अटी-शर्ती घालत संभाजीराजेंची कोंडी केली.

संभाजीराजे पक्षात प्रवेश करत नाहीत हे पाहून पाठिंब्यासाठी त्यांच्यापुढे अनेक अटी-शर्ती ठेवल्या. पुरस्कृत असलात तरी पुढे पक्षाचे आदेश पाळावे लागतील, असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले. काही अटींवर संभाजीराजेंनी तडजोडही केली. मात्र करार मान्य झाला असे वाटत असताना त्यावर स्वाक्षर्‍या करण्याआधीच हा डाव मोडण्यात आला.

मी उभा राहिलो तर माझ्या विरोधात भाजप उमेदवार देऊ शकणार नाही आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडेल, असा युक्‍तिवाद संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे केला. मात्र तो देखील कामी आला नाही. दुसरीकडे भाजपमध्ये संभाजीराजेंबाबत आधीपासूनच अनुकूलता नव्हती. त्यामुळे भाजपने त्यांच्याबाबत मौन बाळगणे पसंत केले. त्यांना खासदारकी देऊनही त्यांचा सहा वर्षांत पक्षाला काहीही फायदा झाला नाही. त्याउपर त्यांनी कधी कधी भाजपला न पटणार्‍या भूमिकाही घेतल्याने भाजपची नाराजी होती.

भाजपने त्यांच्या अपक्ष उमेदवारीचे समर्थनही केले नाही. शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर भाजप पुढे येईल, अशी एक चर्चा होती. मात्र ती देखील फोल ठरली. परिणामी संभाजीराजेंना लढाईआधी मैदान सोडणे भाग पडले. सर्व प्रमुख पक्षांनी मिळून त्यांचा राजकीय गेम केल्याने त्यांची राज्यसभेची दुसर्‍यांदा संधी हुकली.

हेही वाचलंत का ?

Back to top button