मेन लाईनवर एसी लाेकलच्या १२ फेऱ्यांची भर, १४ मे पासून दिवसाला ५६ फेऱ्या धावणार | पुढारी

मेन लाईनवर एसी लाेकलच्या १२ फेऱ्यांची भर, १४ मे पासून दिवसाला ५६ फेऱ्या धावणार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या उकाड्यामुळे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची गर्दी होत आहे. तर दुसरीकडे सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव या हार्बरवरील १६ फेऱ्यांकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे हार्बरवरील एसी लोकल बंद करुन १२ फेऱ्या १४ मेपासून मेन लाईनवर चालविण्यात येणार आहे. यामुळे मेन लाईनवरील एसी लोकलच्या एकुण फेऱ्यांची संख्या ५६ होणार आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तसेच ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर एसी लोकल धावते. यात ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर सेवेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने या मार्गावरील फेऱ्या काही महिन्यांपूर्वी बंद केल्या. तर सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी लोकलच्या फेऱ्यांपैकी १६ फेऱ्याही बंद करुन त्याऐवजी साध्या फेऱ्या सुरु केल्या.

याशिवाय १९ फेब्रुवारी पासून एसी लोकल सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाबरोबरच अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळासाठीही सुरु केल्या. हे बदल होत असतानाच हार्बरवरील ऊर्वरित १६ फेऱ्यापैकी १२ फेऱ्या मुख्य मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावर १२ फेऱ्या साध्या लोकलच्या चालविण्यात येणार आहेत. याशिवाय रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील एसी लोकलच्या काही फेऱ्या चालविण्यात येणार आहे. यामुळे मेन लाईनवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button