राणा दाम्पत्याची १४ मे ला राजधानीत 'महाआरती' | पुढारी

राणा दाम्पत्याची १४ मे ला राजधानीत 'महाआरती'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे  (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे आल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. राज्यात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यां विरोधात राजद्रोहाचे कलम लावण्यात आले, असा आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून केला. यावेळी त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाआघाडी सरकारला सद्सदविवेक बुद्धी द्यावी, असे साकडे घालत १४ मे रोजी राजधानीतील हनुमान मंदिरात (Hanuman Chalisa) ‘महाआरती’ करणार असल्याचे राणा दाम्पत्याने यावेळी जाहीर केले.

राज्य सरकार इंग्रजांच्या काळातील कायदे पाळत आहेत, हे महाराष्ट्राचे दुदैव आहे, अशी खंत व्यक्त करीत राणा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. केवळ मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी राजद्रोहाची कारवाई केल्याचे ते म्हणाले. राजद्रोहाअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईनंतर तुरुंगात वाईट वागणूक देण्यात आल्याची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीत आहेत. यासंबंधी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांची भेट घेवून आपबीती सांगितली आहे.

इंग्रजांच्या काळात अनेक महापुरुषांवर राजद्रोहाचे कलम लावण्यात आले होते. राज्यावरील संकट आणि साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा पठण केले होते. उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. न्यायालयाने आज राजद्रोहाच्या कलमाला स्थगिती दिली आहे. याबद्दल राणा दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कायदा मंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानले. इंग्रजांच्या काळातील कायदा मोडीस काढण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. पंरतु, ठाकरे सरकार अद्यापही इंग्रजांचे कायदे पाळत आहे, हे राज्याचे दुदैव असल्याचे राणा म्हणाले.

नवनीत राणा यांच्या मुंबईतील सदनिके विरोधात महानगरपालिकेने अनियमित बांधकाम प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी बोलतांना राणा म्हणाले, मुंबई महापालिका शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची लंका आहे. २००७ मध्ये इमारत बांधली गेली. त्यानंतर ७ ते ८ वर्षांनी सदनिका घेतली. अनिल परब, संजय राऊत यांच्या दहा-बारा सदनिका आहेत. माझी केवळ एकच सदनिका आहे. पंरतु, सर्व परवानग्या घेवून १५ वर्षानंतर केवळ मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून नोटीस आल्याचा आरोप राणा यांनी करीत महानगर पालिकेच्या निवडणुकीत युद्धपातळीवर उतरू असा इशारा दिला आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button