मुंबईत एनआयएची मोठी छापेमारी, दाऊदशी संबंधित आणि हवाला ऑपरेटर्सवर कारवाई | पुढारी

मुंबईत एनआयएची मोठी छापेमारी, दाऊदशी संबंधित आणि हवाला ऑपरेटर्सवर कारवाई

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईत एक डझनाहून अधिक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. पाकिस्तानस्थित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आणि काही हवाला ऑपरेटर्सच्या संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी केली आहे.

सांताक्रूझ, भेंडीबाजार, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, मुंब्रा आणि अन्य काही ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. दाऊदशी संबंधित अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर माहिती NIA ला मिळाली होती. यासह दाऊद इब्राहिमची डी कंपनीवर कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी दाऊदचे ड्रग्ज पेडलर्स, शार्प शूटर्स आहेत त्या ठिकाणांवर एनआयएने छापेमारी केली आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, NIA ने दहशतवादी कारवायांत सहभाग असणाऱ्या D-कंपनीच्या ऑपरेटर्स विरोधात संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्यांप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे त्यातील अनेकजण परदेशात आहेत.

दाऊद इब्राहिमला २००३ मध्ये भारत आणि ब्रिटनने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा सहभाग असून त्याची माहिती देणाऱ्यास २.५ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत पहिली आणि भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणारा डॉन दाऊद इब्राहिम कराचीत दडून बसला आहे, असे म्हणतात. मात्र, दाऊदचे अस्तित्व आजही कराचीपेक्षा मुंबईत अधिक जाणवते. कराचीत बसून तो मुंबईला अजूनही आपल्या कारवायांच्या तालावर नाचवताना दिसतो.

दाउद इब्राहिम हा ८० च्या दशकात भारतातून पळाला. दुबईमार्गे कराचीमध्ये स्थायिक झाला. लष्करी अधिकार्‍यांसाठी उभारलेल्या अलीशान कॉलनीत तो राहतो, असे म्हणतात. दाऊदने १९९३ ची बॉम्बस्फोट मालिका घडवणार्‍या त्याच्या काही साथीदारांनाही सहजपणे पाकिस्तानात नेले. भाऊ अनिस इब्राहिम आणि खास हस्तक छोटा शकील यांच्या मदतीने त्याने जगभरात आपले मोठे साम्राज्य उभारले आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोस्ट वॉन्टेड डॉन बनला.

पाकिस्ताननेही दाऊद इब्राहिम त्यांच्याकडे नसल्याचा दावा वारंवार केला. मात्र तो फोल ठरला आहे. तो कराचीतच असल्याचे अनेक पुरावे वृत्तवाहीन्यांवर अधुन मधुन सादर केले जातात. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या सर्व हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. मात्र त्याच्यापर्यंत भारतीय यंत्रणा आजवर पोहोचू शकलेल्या नाहीत. मुंबई, ठाण्यात त्याचे हस्तक, त्याचे सुपारी किलर पकडले जातात. अगदी अलीकडेपर्यंत त्याची बहीण हसीना पारकरही मुंबईतील जमिनी बळकावत धमकावत राहिली. तिच्याशीच केलेल्या व्यवहारातून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. याचा अर्थ दाऊदचे अस्तित्व आजही मुंबईत जाणवते.

Back to top button