ठाणे : पुढारी वृत्तसेवा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी १० वाजता ठाणे येथे जाऊन मनसुख हिरेन यांच्या कुटूंबाची भेट घेतली. त्यांनी याआधी ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते-'मी आणि आ. निरंजन डावखरे विकास पाल्म् सोसायटी ठाणे येथे कै मनसुख हीरेनच्या घरी, त्यांचा परिवाराची भेट घेणार.'
आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की-'एनआयएचे म्हणणे आहे की, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनचा खून केला. काय त्यांना अशा प्रकारच्या कामासाठी पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे?'
सोमय्या यांनी हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हिरेन कुटुंबाची वेदना अजून कमी होत नाहीये. ठाकरे सरकारमुळे त्यांना त्रास सहन करावा लागला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना यातना दिल्या. त्यांना माफी मागावी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या माफीया पोलिसांनी हिरेन यांची हत्या केली. ठाकरे सरकारनं वसुलीचं टार्गेट दिलं. प्रदीप शर्मा, सचिन वाझे यांनी हिरेन कुटुंबीयांना अनाथ केलं. या हत्याकांडामध्ये वसुलीचा हेतू होता. ठाकरेंकडून पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर झाला. मुख्यमंत्री कार्यालयानं अनिल देशमुखांना वसुलीचं टार्गेट दिलं होतं.
ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. त्या प्रतिज्ञापत्राद्वारे प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध करण्यात आला होता. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचा दावा एनआयएने उच्च न्यायालयात केला होता.
प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून १७ जून २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शर्मा आणि इतर आरोपींनी युएपीए कायद्यान्वये गंभीर गुन्हा केल्याचेही एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.
प्रदीप शर्मा यांच्या इतर आरोपींसमवेत कट रचण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये बैठका झाल्याचे एनआयएने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. मनसूख हिरेन यांची हत्या करण्यासाठी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी ४५ लाखांची सुपारी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, एनआयएनकडून प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध करण्यात आला. प्रदीप शर्मा निष्पाप नसून त्यांनी अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. गुन्हेगारी कटांमध्ये, खून आणि दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग आहे. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या विभागीय खंडपीठाने या प्रकरणात पुढील सुनावणी १७ जुलै रोजी घेण्याचे निश्चित केलं आहे.