नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वातावरणात उष्णता वाढल्याने सध्या तापमानाचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाचा परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक झाले आहे. देशात मार्च आणि एप्रिल महिन्यात मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वांत जास्त तापमानाची व उष्णतेची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उन्हाचे घातक परिणाम माणसाच्या शरीरावर होताना दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टरांकडून आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीसंदर्भात काही सल्ले देण्यात आले आहेत.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवले पाहिजे. त्यासाठी अधिक प्रमाणात पाणी पिणे हा पर्याय आहे. त्याचबरोबर दही, ताक, लस्सी तसेच थंड पेयांवर भर दिला पाहिजे. घराबाहेर निघताना किमान दोन ग्लास पाणी पिऊन निघावे व सोबत टोपी, सनकोट तसेच त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून सनस्क्रीनचा वापर करावा. उष्ण लाटांचा मानवी त्वचेवर घातक परिणाम होऊ शकतो. त्या अनुषंगाने थंड पाण्याने अंघोळ करणे तसेच टरबूज खाणे हे उपाय त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. दुग्धयुक्त पदार्थांचे सेवन हे पोटात थंडावा निर्माण करतात. या सर्वच बाबी उन्हात शरीराचा समतोल ठेवण्यात उपयुक्त ठरतात. यापलीकडे आपण आवळा, लिंबू, द्राक्ष यासारख्या फळांचे सेवन करावे, जेणेकरून शरीरात पाण्याचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल.
या सर्व गोष्टींचे पालन केल्यास उन्हापासून स्वतःचे रक्षण आपण करू शकतो. पण गरज नसताना बाहेर जाणे आणि मांसाहार पदार्थ तसेच गरम पदार्थ खाणे टाळले, तर उष्णतेपासून होणारी हानी आपण सहज टाळू शकतो.
उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पाणी पिणे, थंड पेयाचे सेवन करणे गरजेचे आहे. बाहेर जात असताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सध्याचे तापमान मानवी शरीरासाठी अधिक घातक आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. अमोल शिंदे, श्री क्लिनिक