वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोळश्याच्या तुटवड्याने लोडशेडिंगच्या वाढत्या संकटावर मार्ग काढत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते आज पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, लोडशेडिंगबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्री याबाबत दर आठवड्याला आढावा घेतील. राज्य सरकार वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण राज्यात कोळशाचा तुटवडा आहे. ही समस्या मोठी असल्याने परदेशातून कोळसा आयात करणार आहे. मंत्री नितीन राऊत, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे दिग्गज लोक देखील कोळसा उपलब्ध करण्याकरिता प्रयत्न करत आहेत. मला कोळश्याच्या पुरवठ्याबाबत कोणावर आरोप करायचे नाहीत. असेदेखील अजित पवार यांनी म्हटले आहे.

प्रतिनिधींनी वापरलेल्या निधीसंबंधीच्या प्रश्नावर बोलत असताना ते म्हणाले की, कोरोना काळात खासदारांना निधी देणे बंद होते. कोरोनाच्या सावटामुळे कदाचित त्यांनी काम केलं नसावं. पण लोकप्रतिनिधींना आता हा निधी पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे. विधानसभा, विधानपरिषद आमदारांना  5 कोटींचा  निधी देण्यात येणार आहे. या निधीतील  पैसे आता लोकप्रतिनिधी खर्च करतील. आम्ही नेहमी या निधीबाबत आढावा घेत असतो. तुम्ही या निधीची प्रशासकीय मान्यता घेतली का, हा निधी वापरला का, असा आढावा आम्ही घेतो. काहीवेळा यामध्ये स्थानिक अडचणी येतात. पण स्थानिक आमदार हा निधी आपआपल्या परीने वापरतात.

अमोल मिटकरी यांच्या सांगली सभेतील वादग्रस्त विधानावर बोलत असताना त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, समाजातील कोणताही घटक दुखावला जाऊ नये. नेत्यांनी वक्तव्य करताना भान ठेवावं.

221 कोटी नागरी बँकांच्या घोटाळ्यावर बोलत असताना ते म्हणाले की, नागरी सहकारी बँकांची नॅशनल बँकांशी तुलना करता या घोटाळ्याचे पाव टक्का इतके प्रमाण आहे. पुढे ते नागरी बँकांना उद्देशून म्हणाले की, कर्ज देत असताना ते बुडवणार नाहीत अशांनाच दिले पाहिजे. हा जनतेचा पैसा असतो तो व्यवस्थितच वापरला पाहिजे, जेणकरून तो सुरक्षित राहील.

दरम्यान, मंत्र्यांनी खासगी हॅास्पिटलमध्ये सरकारी पैशाचा वापर केल्याच्या मुद्यावर बोलत असताना ते म्हणाले की ”मी उपचारासाठी खासगी खर्च केला. मी यासाठी सरकारी पैसा वापरला नाही.” त्यामुळे ज्यांनी हा पैसा वापरला त्यांना याचा जाब विचारा असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

हेही वाचा

Back to top button