कर्नाटक प्रवेशासाठी आरटीपीसीआरची सक्‍ती | पुढारी

कर्नाटक प्रवेशासाठी आरटीपीसीआरची सक्‍ती

कर्नाटक/कोगनोळी ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कोरोना रुग्ण वाढल्यास संबंधित जिल्ह्यातील अधिकार्‍यांना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सीमेवर काटेकोर तपासणी केली जात आहे. लस घेतली तरी सर्वांनाच 72 तासांमधील कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्‍तीचा केल्याने शनिवारी दुपारी तपास नाक्यापासून दूधगंगा नदीपर्यंत वाहनांची तोबा गर्दी झाली.

अहवाल नसलेल्यांना माघारी पाठवण्यात आले. अचानक केलेल्या कारवाईमुळे नाक्यावर गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, दुपारी याबाबतचे सरकारी परिपत्रक जारी करण्यात आले.

नूतन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी कोरोना तपासणी नाक्याला भेट देऊ अधिकार्‍यांना सूचना दिल्या. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना प्रवेश देण्याचे सांगितले. याआधी कोरोना लस घेतलेल्यांना कर्नाटकात प्रवेश दिला जात होता.

कोरोना संसर्ग कमी झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आता केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळालेले नाही. याचा धोका बेळगावसह सीमेवरील काही जिल्ह्यांना असल्याने प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

शनिवारी अचानक नव्या मार्गसूचीची अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक प्रवाशांनी न सोडण्याचे कारण विचारले. दोन लस घेतल्या तरी का सोडण्यात येत नाही, असा प्रश्‍न त्यांनी केला. पण, सरकारी आदेशानुसार केवळ आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असेल तर कर्नाटकात प्रवेश दिला जाईल, असे पोलिस व आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. याबाबत प्रवाशांची समजूत काढताना अधिकार्‍यांना कसरत करावी लागली.

निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीणचे पीएसआय अनिल कुंभार, देवराज उळागड्डी यांच्यासह महसूल खाते, आरोग्य खात्याचे कर्मचारी कार्यरत होते.

करनूर, म्हाकवे, गडहिंग्लज चंदगडसह गोवा भागामध्ये जाणार्‍या वाहनचालकांनाही यावेळी परतव लावण्यात आले. यावेळी काहीणांनी अधिकार्‍यांशी हुज्जत घातली. प्रवाशांची समजूत घालून त्यांना माघारी पाठवण्यात आले.

स्थानिकांना प्रवेशाची मुभा

या नाक्यावरून जाणार्‍या स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पत्रकारांनी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी ओळखपत्र दाखवून अशा लोकांना सोडण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. कोगनोळीसह हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मतिवडेतील नागरिकांना ओळखपत्र दाखवून कर्नाटकात प्रवेश करता येणार असल्याचे सांगितले.

Back to top button