मुंबई : आता काळाचौकी पोलिस ठाण्यात पाणी तुंबणार नाही ! | पुढारी

मुंबई : आता काळाचौकी पोलिस ठाण्यात पाणी तुंबणार नाही !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा जवळ आला की, काळाचौकी पोलीस ठाण्यातील पोलिसांना धडकीच भरते. मात्र आता पोलिस ठाण्यात पावसाळ्यात तुंबनाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी पालिकेला उपाय सापडला आहे. पोलीस स्टेशन परिसरात नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या काळात येथे तुंबणाऱ्या पाण्याचा तातडीने निचरा होणार असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.

मुंबई शहरातील रस्त्यांचा जसजसा विकास होत गेला, तशा जुन्या इमारती रस्त्यापासून अर्धा ते एक फूट खाली गेल्या. त्यामुळे अशा इमारतींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची पावसाळ्यात उडणाऱ्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी त्या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे आकारमान वाढवण्यात येत आहे. काळाचौकी पोलीस ठाणेही रस्त्याच्या पृष्ठभागापासून चार ते पाच फूट खाली असल्यामुळे येथे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पोलिसांसह येथे येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

मुंबई शहरातील जुन्या पोलिस ठाण्यांपैकी एक असलेले काळाचौकी पोलिस ठाणे हे ब्रिटिश काळात बांधलेले असून, त्याला हेरिटेज दर्जा मिळाला आहे. हे पोलिस ठाणे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने पालिका येथे पर्जन्यजलवाहिनी टाकण्यास तयार नव्हती. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून केवळ महापालिका व राज्य सरकारच्या स्तरावर चर्चा सुरू होती.

अखेर पोलिस व नागरिकांच्या सतत करण्यात येणाऱ्या विनंतीमुळे पालिकेने येथे 300 मिमीची पर्जन्य जलवाहिनी टाकण्याची तयारी दर्शवली. या कामासाठी पालिकेने निधी मंजूर केला असून, या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या कामासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्यामुळे 2023 च्या पावसाळ्यात येथील पोलिसांना तुंबणाऱ्या पाण्यापासून दिलासा मिळेल. पोलिस ठाण्याच्या आसपासच्या परिसरात मुंबई पोलिसांचे बाॅम्बविरोधी पथक, एटीएस कार्यालये, पोलिस वसाहत इमारती आणि काळाचौकी काॅलनी आहे. या परिसरातही पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. तेथेही लवकरच पर्जन्य जलवाहिन्या टाकून तुंबणाऱ्या पाण्याची समस्या दूर करणार येईल, असे पालिकेच्या पर्जन्यजल व्यनि विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचलत का ?

Back to top button