पुणे : प्रेमसंबंधातून महिलेचा खून; संशयित आराेपीस अटक | पुढारी

पुणे : प्रेमसंबंधातून महिलेचा खून; संशयित आराेपीस अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: प्रेमसंबंधातून झालेल्या वादात महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिने, मोबाईल देखील चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी किसन सिताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि़ पुणे) याला अटक केली आहे. याबाबत सुनीता कदम हिच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता कदम या आपली मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. त्याचे किसन जगताप याच्याशी प्रेमसंबंध होते. दाेघांमध्‍ये शनिवारी रात्री वाद झाला. तेव्हा किसन जगताप याने सुनिता कदम यांचे डोके भिंतीवर आपटले. त्यात सुनिता यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनीता कदम यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन किसन जगताप पसार झाला. हडपसर पोलिसांनी किसन जगताप याला अटक केली आहे.  सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button